अहमदनगर बातम्या

Bhandardara News : भंडारदरा पाणलोटामध्ये पाऊस गायब ! भात पिके संकटात

Published by
Ahmednagarlive24 Office

Bhandardara News : भंडारदरा पाणलोटात पावसाने दडी मारल्याने भात पिके संकटात आली आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी भागात पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या खतांचा तुटवडाही आदिवासी बांधवांसाठी हानीकारक ठरत आहे. काळ्या बाजाराने खतांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा हे भातपिकांसाठी प्रसिद्ध आहे. भातपिकांसाठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने जास्त पाऊस पडणाऱ्या भागातच भाताची लागवड केली जाते. भंडारदरा हा घाटमाथ्यावर असल्यामुळेच या भागात प्रमुख भातपिक घेतले जाते.

सुरुवातीलाच पावसाने दिलेल्या तानामुळे भाताच्या लागवडी उशीरा सुरु झाल्या. नंतरच्या कालावधीमध्ये भातपिकांसाठी आवश्यक असणारा पाऊस पडला; मात्र आठ दिवसांपासून भंडारदऱ्याच्या पाणलोटात पावसाने दडी मारली आहे.

त्यामुळे भात खाचरातील पाणी कमी झाले आहे. काही शेतामध्ये पाणीच राहिले नाही. त्यामुळे भाताची राने तडकू लागली आहेत. आणखी चार पाच दिवस पावसाने जर दडी मारली तर ही भातपिके संकटात येणार आहेत.

जी भातपिके चांगली आहेत, त्यांच्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता आहे; मात्र भंडारदऱ्याच्या आदिवासी शेतकऱ्यांना लिकिंगची खते घ्यावी लागत आहे. भातलागवड करताना भाताचे बी ज्या दुकानात घेतले,

तेथेच युरीयाची गोणी घ्या, असा सल्ला कृषी विभागाच्या दुकांनामधुन दिला जात आहे; मात्र जास्त पैसे मोजणाऱ्यांना मात्र तात्काळ रासायनिक खतांच्या गोण्या उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

शेंडी येथील प्रमुख कृषी दुकानांबरोबरच राजुर येथील कृषी दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणात खतांचा काळा बाजार सुरु आहे. भंडारदऱ्याच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना थेट ईगतपुरी, घोटी, राजुर, अकोले अशा ठिकाणी जाऊन खते आणण्याची वेळ आली आहे.

शेंडी येथील बाजारपेठेत मात्र खतच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. कृषी विभागाशी खतांच्या काळ्या बाजारासंदर्भात विचारले असता, शेतकऱ्यांनी आम्हाला लेखी दिल्यास आम्ही सदर दुकांनावर कारवाई करू, असे सांगण्यात आले;

परंतु आदिवासी शेतकरी अशिक्षित असल्याने लेखी तक्रार करु शकत नाही. त्यामुळे कृषी विभागानेच दुकानदारांना पाठिशी न घालता कारवाई करून आदिवासी बांधवांना न्याय देण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office