गेल्या आठ दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, पाडळी परीसरात सातत्याने रिमझिम पाऊस सुरूच असल्याने आठवडाभरापासून सूर्यदर्शन झालेले नाही.
प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया मंदावली असल्याने पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग, आदी पिके पिवळी पडत असून पिकांवर रोगराईचे सावट निर्माण झाले आहे.
आधीच एक महिना उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरण्या उशिराने झाल्या. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अशा परिस्थितीमध्ये पिकांना सूर्यप्रकाशाची नितांत आवश्यकता असताना गेल्या आठ दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्यामुळे पिकांची परिस्थिती हालाखीची झाली आहे.
सततच्या रिमझिम पावसामुळे तणाची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, शेतीचा लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणींमध्येसुद्धा वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण जरी अत्यल्प असले तरी जमीन वापसा होत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.
तसेच मोठा पाऊस नसल्यामुळे क्षेत्रातील पातळी खालावली असून, नदी-नाल्यांना अद्याप एकही पूर आलेला नाही. तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. नदी नाल्यांना अद्यापही पूर आलेला नाही.
वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही जलजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असून, तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, हिवताप, मलेरिया, डेंग्यूसदृश तापाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.