अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने पाठ फिरवली ! खरीप हंगाम वाया

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. खरीपाच्या पेरण्या धोक्यात आल्या असून अनेक ठिकाणी उगवण झाली नाही, तर ज्या ठिकाणी उगवण झाली, तेथे तातडीने पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

परिणामी वेळेवर पाऊस होत नसल्याने राहाता तालुक्यासह इतरही तालुक्यांतील अनेक भागात शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून मोठ्या संकटात सापडला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यात पाऊस चांगला बरसेल, अशी अपेक्षा असताना पाऊस पाहिजे त्या प्रमाणात न झाल्याने अनेकांच्या पेरण्यासुद्धा रखडल्या आहेत. झालेल्या पेरण्यांमध्ये काही ठिकाणी शेतात बियाणांची उगवण झाली नाही तर अनेक ठिकाणी विरळ स्वरूपात उगवण झाली आहे.

ज्या ठिकाणी बियाणे चांगल्या प्रकारे उतरलेले आहे तेथे पिकाला लगेच पावसाची अर्थात पाण्याची आवश्यकता आहे; परंतु सुरुवातीचे एक-दोन पाऊस झाल्यानंतर पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकणार आहे.

कारण यापूर्वी खरिपासाठी घेतलेली मोठी मेहनत त्याचबरोबर पेरणी, मशागत, बियाणे, औषधे, खते यासाठी घरातील सोनं नाणं मोडून काहींनी उसनवारी करून खरीप हंगामात पिके घेण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव केली होती; मात्र आता वेळेवर पाऊस होत नसल्याने ही मेहनत व झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शेतकरी चिंतेत असून जर असे झाले तर दुबार पेरणीचे संकट घोंगावे त्या क्षणी अनेक शेतकरी दुबार पेरणीस धजावणार नाही. कारण हंगाम पुढे लांबला जाईल व उत्पादन घटले जाईल.

त्याचबरोबर पुढील पिके घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून वेळेत पाऊस न झाल्यास शेतकरी डोक्यावर दुबार पेरणीचे संकट घेण्याऐवजी दुबार पेरणीकडे पाठ फिरवणे पसंत करतील, अशी चर्चा शेतकरी बांधवांच्या वर्तुळात आहे.

Ahmednagarlive24 Office