Ahmednagar News : उन्हाळ्यात अत्यंत गरमीने उच्चांक गाठलेला असताना कर्जत तालुक्यातील पाटेवाडी आणि परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, यामुळे विजेचे अनेक पोल जमीनदोस्त झाले.
आज (दि १७) एप्रिल रोजी सायंकाळी साधारण पाच वाजण्याच्या सुमारास पाटेवाडी आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, या वादळी वाऱ्यामुळे पाटेवाडीत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त उभारलेला मंडप मोडून पडला.
तर गावातील व शेतातील अनेक लाईटचे पाले पडले. यामुळे परिसरातील विज पुरवठा खंडित झाला आहे. या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे, साठवलेल्या कांद्याचे तसेच मका, कडवळ यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याशिवाय अनेक फळबागांचेही बरेच नुकसान झालेले आहे. सरकारने याची तातडीने दखल घ्यावी व झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी चेअरमन व भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष राजे निंबाळकर यांनी केली आहे.