अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यातच गेल्या दोन दिवसात नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली आहे.
यातच शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगर शहरात पावसाने हजेरी लावली होती. तसेच भंडारदरा धरण परिसर तसेच पाणलोटात विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात काल गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत भंडारदरात या पावसाची नोंद 15 मिमी झाली. रतनवाडी आणि घाटघरध्येही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी सोंगणीला आलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.
या अवकाळी संकटामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. ऐन थंडीत पावसाने हजेरी लावली असल्याने बळीराजाला पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.