अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणार्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकर्यांच्या आशा आता मावळल्या आहेत.
या अस्मानी संकटामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिसकावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. नेवासा तालुक्यातीाल प्रवरासंगम,जळके बुद्रुक भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात रोज पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.
या भागातील प्रमुख पीक सोयाबीन व कपाशी आहे. सोयाबीन पीक काढणीस येत असताना सततच्या पावसाने शेंगांमधून अंकुर बाहेर पडू लागले. कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांतील सोयाबीन, उडीद, मूग, कांदा, कापूस , भाजीपाला आदी पिके जोमात आली होती परंतु गेल्या आठ दिवसांत 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर मध्ये रोज दुपारी व रात्रीच्या वेळी पाऊस पडल्याने सर्वत्र दलदल निर्माण झाल्याने त्यातच सुर्यप्रकाश नसल्याने
मेहनतीने तयार केलेल्या पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या नैसर्गिक संकटापुढे शेतकरी मात्र हताश झाला आहे. या खरीप हंगामातील पिकांचे पीकविमा अनेक शेतकर्यांनी भरले आहेत.
आता विमा कंपनीकडून याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच हतबल झालेल्या शेतकर्यांना आधार देण्यासाठी शासनाने देखील तातडीने पावले उचलून मदत देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे शेतकर्यांमधून बोलले जात आहे.