अहमदनगर बातम्या

अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर वाळूमाफियांच्या दहशतीखाली राजरोस वाळूउपसा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील घुमरी येथील होणाऱ्या वाळूउपशाबाबत गेली अनेक वर्षे ग्रामस्थ लढा देत असताना प्रशासन कोणतीच दखल घेत नसून गावातील नागरिकांना वाळूमाफिया थेट खुनाची धमकी देत राजरोस वाळूउपसा करत आहेत.

महसूल अधिकारी व पोलीस गावातील नागरिकांचा खून होण्याची वाट पाहत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत वाळूमाफियांच्या हाताने मरण्यापेक्षा आम्ही प्रशासनाच्या नावाने आत्मदहन करून मरण्यास तयार असल्याचा इशारा पत्रकार परिषद घेऊन अॅड. शिवाजीराव अनभुले व ग्रामस्थांनी दिला आहे.

घुमरी ग्रामसभेने ठराव केलेला आहे. अनेक तक्रारी केलेल्या आहेत, हायकोर्टात वाळूउपशाविरुद्ध याचिका दाखल केलेली असताना वाळूउपसा मात्र बंद होत नसल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घुमरी येथून सीना नदीमधून गेल्या अनेक वर्षांपासून राजरोस वाळूउपसा होत आहे. या विरुद्ध घुमरी ग्रामस्थ विविध पातळीवर लढा देत आहेत. मात्र, बाळू माफिया प्रशासनाच्या मदतीने कुणालाही न जुमानता वाळूउपसा करत आहेत,

सीना नदीत मोठ मोठे खड्डे पडले असून, यामुळे गावाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे गावातील गावातील रस्ते पूर्णतः खराब झाले असून, नागरिकांना जीव मुठीत धरून वागावे लागत आहे.

गावातील नागरिकांना दमबाजी केली जात असून वाविरुद्ध आवाज उठवीत अॅड. शिवाजीराव अनभुले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देत वाळूउपसा बंद करून कारवाई करावी अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

वाळू उपशामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, याविरुद्ध निवेदनावर सह्या करणाऱ्यांना दूरध्वनीद्वारे थेट खुनाच्या व टोपर अंगावर घालण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे संपूर्ण गाव या वाळूमाफियांच्या दहशतीखाली वावरत असताना प्रशासनाकडे कारवाईसाठी डोळे लाऊन बसलेले आहे.

आगामी ३० सप्टेंबरपर्यंत येथील वाळूउपसा बंद न झाल्यास व न्याय न मिळाल्यास दि. ३० तारखे नंतर ग्रामस्थ आत्मदहन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

 

Ahmednagarlive24 Office