अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-मागील चार पाच महिन्यांपूर्वी कोरोनाच्या काळात गावागावातील रस्ते बाहेरच्यांसाठी बंद करण्यात आले होते.
कोरोनाच्या धास्तीने नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात असलेली मंडळी मूळ गावी परतण्यासाठी धडपड करीत होते मात्र त्यांना गावात प्रवेश दिला जात नव्हता.
गावी आले तरी मोकळ्या जागेत,शाळेत काही दिवसांसाठी क्वारंटाईन केले जात होते. परंतु, आता ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आणि याच मंडळींसाठी गावातुन गावाकडे येण्यासाठी फोनवरून आग्रह केला जात आहे.
गाव कारभारी होण्यासाठी इच्छुक असलेले नेते अशा मंडळींशी संपर्क साधून त्यांना लक्ष ठेवण्याची विनंती करीत आहेत. मतदानासाठी आवर्जून गावात येण्याचे आग्रहाचे निमंत्रणही देण्यात येत आहे.
नगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींसह जिल्ह्यात जवळपास साडेसातशे ग्रामपंचायतींची निवडणुक पुढील महिन्यात होत आहे. 15 जानेवारी रोजी मतदान असून ग्रामपंचायतींच्या मतदारांपैकी अनेकजण नोकरी,
व्यवसायानिमित्त पुणे,मुंबई, नाशिक अशा मोठ्या शहरात वास्तव्यास आहेत. मतदार यादीतील अशा नावांचा शोध घेवून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.
त्यांना आग्रहपूर्वक मतदानाला येण्याची विनंती करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच आपल्याच गावासाठी परके झालेल्यांसाठी हा बदल आश्चर्यात टाकणारा ठरत आहे.