Ahmednagar News : देशात रामराज्य मग आमच्यासोबत दुजाभाव का? बँकेचे कर्ज कसे फेडायचे, चूल कशी पेटवायची?..कांद्याचे भाव ८ रुपयांवर आल्यावर शेतकऱ्यांची व्यथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. लाल कांद्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या. परंतु सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणामुळे लाल कांद्याच्याही किमती घसरल्या आहेत.

तब्बल ८ ते ९ रुपये प्रतिकिलोवर कांद्याचे भाव आले आहेत. श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी ८ ते ९ रुपये किलो याप्रमाणे भाव निघाले.

मार्केटमध्ये दहा हजार गोण्या गुलाबी कांद्याची आवक झाली होती. कांद्याचे भाव इतके कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

श्रीगोंदा तालुक्याची कांद्याचे आगार अशी ओळख आहे. येथील शेतकरी श्रीगोंदा, पारगाव फाट्यावरील चैतन्य बाजाराप्रमाणे राज्यासह देशातील इतर बाजारपेठेतही कांदा विकतात. गेल्यावर्षी कांद्याला चांगले भाव मिळाले होते.

मात्र, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

 एकरी खर्च ६० हजार, पट्टी येते ४० ते ४२ हजारांची

खराब हवामानामुळे गुलाबी कांद्याचे एकरी उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटले आहे. अशा परिस्थितीत भाव कमी झाले. एकरी उत्पादन खर्च ५५ ते ६० हजार इतका आहे. भाव कोसळल्याने एकरी ४० ते ४२ हजारांची पट्टी हातात पडू लागली आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

यंदा दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. कांद्यातून चार पैसे मिळतील अशी आशा होती. एका बाजूला उत्पादन घटले आणि दुसया बाजूला भाव पडले. केंद्र सरकारने शहरी भागाचा विचारही करावा, लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारू नये अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

 देशात रामराज्य मग शेतकऱ्यांसोबत दुजाभाव का?

कांद्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत. शेतकरी अतिशय उदासीन झाला आहे. निर्यातबंदीच्या धोरणामुळे कांडा भाव अत्यंत गडगडला आहे. देशात रामराज्य आणल्याचे बोलले जाते. मात्र, कांदा व इतर शेतमालाचे भाव घसरत आहेत.

शेतकऱ्यांबाबत दुजाभाव केला जात आहे. आता जगावे की मरावे हेच समजत नाही असा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. बँकेचे कर्ज कसे फेडायचे आणि चूल कशी पेटवायची? मुलांचे शिक्षण कसे करायचे? असे प्रश्न आम्हाला पडले असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.