अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नामंजूर केले आहेत.(Raosaheb Patwardhan Patsanstha )
यामध्ये पतसंस्थेची अध्यक्ष लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी व संचालक लक्ष्मण सखाराम जाधव, प्रकाश नथ्थू सोनवणे यांचा समावेश आहे.
मंगळवारी जामीन अर्जावर सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. बुधवारी अर्जदार पक्षाचा युक्तीवाद झाला. यानंतर न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.
ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. या चौघांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. युक्तिवादात अॅड. पवार यांनी सांगितले की, संचालकांनी ठेवीदारांच्या कोट्यवधी रूपयांचा अपहार केला असून, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे.
याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. या अपहाराचे फॉरेन्सिक ऑडिट झाले आहे. यात संस्थेच्या संचालकांनी 65 कोटी 31 लाख 80 हजार 253 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 248 संचालकांचे जबाब नोंदविले आहेत. पतसंस्थेच्या कर्ज वितरणात मोठी अनियमितता आहे, असे सांगितले होते. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्यधरून न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.