अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- ई-पॉस मशिनमुळे गोरगरीब नागरिकांना धान्य मिळत नसल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.या विषया लवकरात लवकर लक्ष घालून ऑफलाईन धान्य वाटप करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल,
असा इशारा रिपाईचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष योगेश अप्पासाहेब बनसोडे यांनी दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गरीब रेशनकार्ड धारकांना शासनाकडून ई-पॉस मशिनवर दरमहा धान्य मिळते.
परंतु सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याने ग्राहक सध्या दुकानासमोरच दिवसभर थांबलेले दिसून येत आहेत.
दुकानदारांना ऑफलाईन धान्य वाटप का करीत नाही विचारले असता, आम्हाला वरून आदेश आहे, की ई-पॉस मशिनवर धान्य वितरण करावयाचे आहे.
त्यामुळे सर्वसामान्य तसेच हातावरील गरीब लोकांचे हाल होत आहे. या विषयात लवकरात लवकर लक्ष घालून ऑफलाईन धान्य वाटप करावे, दरम्यान आठ दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाई तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.