अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी चालवलेला १ लाख ७६ हजार ३६७ रुपयांचा ५ हजार ८७८ किलो रेशनचा तांदूळ तसेच ७ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ८ लाख ७६ हजार ३६७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो मालक महावीर वसंतलाल गांधी (रा.पारगाव सुद्रिक) आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर असे की पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गांधी यांच्या मालकीच्या टेम्पोत रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेवून जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यांनी रात्र गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक सुनिल सुर्यवंशी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार या रस्त्याने जाणाऱ्या आयशर (एम.एच.१२.एच.डी. २७२७) या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने टेम्पो काही अंतरावर नेऊन पारगाव वडाळी काळे यांच्या गोडावुनच्या शेजारी उभा करून तो पसार झाला.
पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी टेम्पोची पहाणी केली असता त्यात पांढऱ्या रंगाच्या गोण्यांत तांदुळ आढळुन आला. हा तांदुळ रेशनचा असल्याचा संशय आल्याने तसेच टेम्पो चालक पळून गेल्याने पोकॉ.प्रताप देवकाते, दादासाहेब टाके यांच्या हा टेम्पो पोलिस ठाण्यात आणला.
पुरवठा अधिकारी सुनिल पाचारणे यांनी पंचनामा करत हा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पोकॉ.अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो मालक महावीर गांधी आणि चालक यांच्यावरगुन्हा दाखल केला आहे.
टेम्पो चालकाचा पोलिस त्याचा शोध घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप तेजनकर हे करत आहेत.