पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की, साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात होत असते. वेळेवर उपायोजना केल्यास साथीच्या आजारांना आळा घालता येऊ शकतो. झिका डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया, या विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपयोजना सुरू केल्या आहे.
परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्यक असते. नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराबरोबर परिसराची स्वच्छता करावी, या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल.
डेंग्यूमुक्त अहमदनगर शहर बनवण्यासाठी लोकचळवळीची खरी गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. विनायकनगर येथे अहमदनगर महानगरपालिका व आरोग्य विभाग यांच्या वतीने नगर शहर डेंग्यूमुक्त जनजागृती अभियानाचा शुभारंभ आ. जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला, या वेळी ते बोलत हेते.
या वेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. अखिल धानोरकर, डॉ. तृप्ती बनसोडे, डॉ. आयेशा शेख, प्रभाग समिती अधिकारी नानासाहेब गोसावी आदींसह नागरिक उपस्थित होते.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, झिका- डेंग्यू, आदी विषाणूजन्य आजार एडीस डासामुळे पसरतो, त्यामुळे एडीस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे आवश्यक असून, याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
डास निर्मूलनासाठी धूर, औषध फवारणी, आदी उपयोजना महापालिकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहे. नागरिकांनी स्वच्छ पाण्याची ठिकाणे स्वच्छ करावी, स्वच्छ पाण्यामध्येच डासाची उत्पत्ती होत असते, यासाठी महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वे सुरू केला आहे. प्रत्येकाने आपल्या घराची काळजी घ्यावी व महापालिकेला सहकार्य करावे, असेही ते यावेळी म्हणाले.