अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- हवामानात झालेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर दुष्परीणाम झाला आहे. वातावरण बदलाने फळे व पालेभाज्यासह इतर शेतमालावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे.
परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक अशी स्थिती झाली आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड गारठा वाढला असून धुके देखील मोठ प्रमाणात पडले होते.
कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला, ज्वारी आदी पिकांवर या हवामानाचा विपरित परिणाम झाला असून, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी एकीकडे शेतकऱ्यांना आता महागडी औषधे फवारणी करावी लागत असून त्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.
तर दुसरीकडे प्रत्यक्ष शेतमाल विक्रीतून त्या तुलनेत कमी रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता काही भाज्यांचे दर देखील चांगलेच कोसळले आहेत.
यात टोमॅटो, वांगी, मेथी व कोथिंबीरीचे दर कमी झाले आहेत. तर गवार, दोडका, कारले, हिरवी मिरची, शेवगा यांचे दर चांगलेच वधारले आहेत.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत : टोमॅटो २० रुपये प्रति किलो, वांगी ४०, फ्लावर ३०, कोबी २५, काकडी २५, गवार १४०, दोडका ५५ ते ६०, कारले ६०, भेंडी ६०,
घेवडा ३०, डिंगरी ४०, लसूण ४०, हिरवी मिरची ६५, शेवगा १५०, लिंबू २५, शि.मिरची ४०, मेथी जुडी६, कोथिंबीर जुडी ८ रुपये असे दर मिळाले.