अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा केली जात आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे वक्तव्य आणखी ऐकलं नसल्याचं म्हटलंय.
मात्र काम करत असताना एक ताकद मिळावी असे प्रत्येकाला वाटते. मुख्यमंत्री म्हणून ही ताकद जास्त मोठी असते. आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंतराव यांनी ते व्यक्तव्य केलं असावं, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना रोहीत पवार यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले.
“आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंत पाटील असं काही बोलले असावेत. जयंतराव यांचं त्यांच्या मतदारसंघासोबतच पूर्ण राज्यात मोठं काम आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील राज्यभर फिरत असतात. मुख्यमंत्री म्हटलं की काम करताना जास्त ताकद मिळते.
जनतेची सेवा जास्त प्रमाणात करता येते. याच करणामुळे जयंत पाटील असे म्हणाले असावेत,” असे स्पष्टीकरण रोहीत पवार यांनी दिले.