अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातला मुख्य सूत्रधार ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठेचा पूर्व इतिहास हा ‘ब्लॅकमेलर’ हा आहे, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप मयत रेखा जरेंचा मुलगा रुणाल जरे याने केलाय.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे रुणालने हा आरोप केला आहे. दरम्यान, या हत्याकांडाच्या एक महिन्यानंतरही मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरार असल्याने चौकशी रेंगाळल्याची खंतही रुणालने व्यक्त केलीय.
रेखा जरे यांच्या हत्याकांडातल्या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी या खटल्याचं कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात (द्रुतगती न्यायालयात) चालविण्यात यावं आणि यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम किंवा अॅड. उमेश यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे हत्याकांड राज्यभर चर्चेचा विषय ठरलं असून या हत्याकांडाची चौकशी लांबणीवर पडत असल्याने संशयाला वाव मिळत असल्याचं रुणाल जरे याचं म्हणणं आहे. रेखा जरेंचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे आणि अॅड. सचिन अशोक पेटकर या दोघांनी संयुक्तपणे दिलेल्या या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री, गृृहमंत्री, पोलीस कमिशनर आदींना पाठविण्यात आल्या आहेत.