अहमदनगर बातम्या

श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाचा निकाल राखीव ठेवला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. मात्र सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्याबाबतचे अपिल उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली.

पंचायत समितीच्या सभापती संगिता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आले. यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. हे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या वंदना मुरकुटे या पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. यावेळी काँग्रेसच्यावतीने वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्यावतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी कल्याणी कानडे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. डी. जोंधळे तर वैशाली मोरे यांच्यावतीने अ‍ॅड. एस. बी. काकड यांच्या मार्फत्त पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा,

असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला. सदरचे दोन्ही उमेदवारी अर्ज अन्य प्रवर्गातील उमेदवार असून हे इतर मागास महिला प्रवर्गाचे नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले तर वंदना मुरकुटे या इतर मागास प्रवर्गातून निवडून आल्या असून त्यांनी जातीचे दाखल्यासह सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.

आरक्षित पदाकरिता एकच सदस्य पात्र असल्याने मतदानाची गरज पडली नाही. सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून सदरचा निकाल बुधवार दि. 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत जाहीर करणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी अनिल पवार यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office