‘त्या’ ट्रान्सफाॅर्मरमुळे पिके जळण्याचा धोका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील सांडवा येथील ढोली चिंच परिसरात 63 केव्हीचे ट्रान्सफार्मर मागील दीड ते दोन महिन्यापासून बंद असल्याने मोटारीने शेतात पाणी देता येत नसल्याने शेतकर्‍यांच्या फळबागा व पिक जळण्याची परिस्थिती ओढवली आहे.

महावितरण विभागाने तातडीने लक्ष घालून सदर ट्रान्सफार्मर बदलण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता (ग्रामीण) ठाकूर व उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण) पाटील यांना दिले.

यावेळी प्रवीण खांदवे (बापू), मनोहर खांदवे, अमित गांधी, गौरव बोरकर, गणेश निमसे, हर्षलाताई एडके, शहानवाज शेख, दीपक गुगळे, अविनाश काळे, बाळासाहेब केदारे, संतोष उदमले आदी उपस्थित होते. मौजे सांडवा येथील ढोली चिंच येथे 63 केव्हीचे ट्रान्सफार्मर खराब असल्याने शेतकर्‍यांना वीज उपलब्ध होत नाही.

तर वीज उपलब्ध नसल्याने शेतात मोटारीने पाणी देणे बंद झाले आहे. उत्तम पाऊस होऊन देखील पाणी उपसा करता येत नसल्याने शेतकर्‍यांच्या फळबागा व पिके पाण्याअभावी जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील शेतकर्‍यांनी दीड महिन्यापुर्वी महावितरण कार्यालयास पाठपुरावा केला होता.

मात्र अद्यापि त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. शेतकर्‍यांपुढे कोरोना महामारी, अतिवृष्टी हे मोठे संकट उभे राहिले असताना महावितरणच्या कारभाराने त्यांच्या संकटात आनखी भर पडली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शेतकर्‍यांची परिस्थिती गंभीर असताना या प्रश्‍नाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

तरी तातडीने महावितरण कार्यालयाने ढोली चिंच परिसरात असलेले 63 केव्हीचे ट्रान्सफार्मर तातडीने बदलावे अथवा दुरुस्त करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सात दिवसाच्या आत सदर मागण्यांची पुर्तता न झाल्यास महावितरण कार्यालयात संघटनेच्या वतीने शेतकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24