Ahmednagar City News : रस्ता खोदून काम बंद ठेवले; आयुक्तांच्या दालनात संतप्त नगरसेवकांचा ठिय्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar City News : बोल्हेगाव नागापूर परिसरातील गणेश चौक-केशव कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे काम मनपाने गेल्या ५ ते ६ महिन्यांपूर्वी सुरु केले होते. रस्त्याचे खोदकाम करत असताना त्यात पाईपलाईन असल्याने ते स्थलांतरित कराव्या लागत होत्या.

ते काम पूर्ण झाल्यानंतरही ठेकेदाराने संबंधित रस्त्याचे काम सुरु केले नाही, त्यामुळे खोदलेल्या रस्त्यात पावसाच्या पाण्याचे तळे साचून रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे नागरिकांना येथून पायी चालणे देखील कठीण झाले आहे.

नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्याचा रोष नगरसेवकांना सहन करावा लागत असल्यामुळे नगरसेवकांनी आक्रमक होत मनपा आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

यावेळी नगरसेविका कमलताई सप्रे, नगरसेवक अशोक बड़े, नगरसेविका रिता भाकरे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, नगरसेवक राजेश कातोरे, सागर बोरुडे आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी नगरसेवकांना सांगितले की, मी उद्या प्रत्यक्षात रस्त्याची पाहणी करून तातडीने प्रश्न मार्गी लावला जाईल.

सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील असे ते म्हणाले. दरम्यान, नगरसेवक बड़े म्हणाले की, या रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने मार्गी न लागल्यास गणेश विसर्जनानंतर महापालिकेत आमरण उपोषण केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

तर माजी नगरसेवक सप्रे म्हणाले की, रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. हा रस्ता वर्दळीचा असून या ठिकाणाहून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. याच रस्त्यावर माझे संपर्क कार्यालय असून तेथेही मला जाताना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सांगत संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.’