अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- शहरांमध्ये पाईपलाइन, वीज तारांचे भुयारी वायरिंग व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दोन ते तीन दिवसात सुरु होणार असून, या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी (दि.31 जानेवारी) दिल्लीगेट येथील रस्त्याची पहाणी केली.
तर संबंधीत ठेकेदार व मनपा अधिकार्यांना काम चांगल्या पध्दतीने दर्जेदार व लवकर होण्याबाबत सूचना केल्या. यावेळी मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे, अमृत योजना प्रमुख रोहिदास सातपुते, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, सदाशिव रोहोकले,
माजी नगरसेवक संजय झिंजे, दीपक सुळ, सारंग पंधाडे, दिलदारसिंग बीर आदी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरातील मंजूर झालेल्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दोन ते तीन दिवसात सुरु होणार आहे.
रविवार असून देखील सदर काम तातडीने होण्यासाठी ठेकेदार व महापालिका अधिकार्यांची महापालिकेत संयुक्त बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण नेहमी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. शहरांमध्ये पाईपलाइन, वीज तारांचे भुयारी वायरिंग व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले होते.
यामुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत आमदार जगताप यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून शहरातील खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे काम मंजूर करुन आनले आहे.
लवकरच डावरे गल्ली, धरती चौक ते हातामपूर, जिल्हाधिकारी कार्यालय ते चांदणी चौक, नगर कॉलेज, मंगळगेट रस्ता ईदगाह मैदान, रामचंद्र खुंट ते अशोका हॉटेल रस्ता, गोगादेव मंदिर ते जिल्हा परिषद कॉटर, तोफखाना,
माळीवाडा अंतर्गत रस्ते, वाडिया पार्क, जुनी महापालिका ते शनी चौक, तख्ती दरवाजा, आशा टॉकीज चौक ते पंचपीर चावडी, जुना बाजार रोड, व दिल्लीगेट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार आहे.