Rohit Pawar : रोहित पवार यांची आज ईडी चौकशी, शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार आमदार रोहित पवार हे चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती आहे.

रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच असणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितले आहे.

आमदार रोहित पवार हे आज हॅाटेल ड्रायडंट येथून १०. ३० वाजता ईडी कार्यालयाकडे निघणार आहेत. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे ९.४५ वाजता सिल्व्हर ओक येथून पक्ष कार्यालयासाठी निघणार आहेत

दरम्यान, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे मंगळवारी चौकशीला गैरहजर राहिले. त्यांनी वैद्यकीय कारण देत ईडीकडे आणखी वेळ मागितल्याची माहिती मिळते.

मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचे कथित उल्लंघन करत जोगेश्वरी येथे एका आलिशान हॉटेलचे बांधकाम करून मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने आमदार वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी ईडीने वायकरांना २३ जानेवारीला चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.

दरम्यान, आमदार रोहित पवार हे चौकशीला हजर राहणार असल्याचे समजते. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी ईडी कार्यालयाबाहेर गोळा होण्याच्या शक्यतेतून येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

रोहित पवारांना गप्प करण्यासाठी ईडीची नोटीस – चव्हाण
आमदार रोहित पवार यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवतानाच युवकांचेही प्रश्न समोर आणले. यामुळे त्यांना गप्प करण्यासाठी ईडीच्या माध्यमातून सरकारने खटाटोप चालवला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे.