Ahmednagar News:दिल्ली सरकारच्या कथित मद्यधोरण घोटाळ्यासंबंधात सीबीआयकडून कारवाई सुरू असलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे.
सिसोदिया यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सोशल मीडियात मोहीम सुरू झाली आहे. त्यामध्ये रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘खोटे आरोप करून आणि सीबीआयचे छापे टाकून एखाद्या चांगल्या नेत्याची प्रतिमा मलिन करून विरोधी पक्षाला निवडणुकीत घेरता येत नाही.
ये जो पब्लिक है ये सब जानती है।‘ या ट्विटसोबत पवार यांनी सिसोदिया यांच्या समवेतचे छायाचित्रही शेअर केले आहे. मनीष सिसोदिया यांच्या घरी शुक्रवारी सीबीआयने छापे टाकले होते.
आता सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य १४ लोकांविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे.
सिसोदिया यांच्याशी संगनमत करून अमित अरोरा, दिनेश अरोरा आणि अर्जुन पांडेय यांनी परवानाधारकांकडून मिळालेला अवैध पैसा वळवल्याचे पुरावे मिळाले असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
सिसोदिया यांच्या एका सहकाऱ्याच्या कंपनीला कथितपणे एक कोटी रुपये देण्यात आल्याचाही दावा सीबीआयने केला आहे.