अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप कर्जत येथील शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला.
तसेच यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये होत असलेल्या कार्यक्रमावर देखील बहिष्कार टाकला.
कर्जत येथे शनिवारी सकाळी तालुका शिवसेनेच्या पदाधिकार्यांची तालुका प्रमुख बळीराम अण्णा यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत शहरांमध्ये होत असलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला.
त्यानंतर मिरजगाव येथे क्रांती चौकात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडीला घेराव घालून कार्यक्रमास उपस्थित न राहण्याची मागणी करण्यात आली.
आ. पवार हे महाविकास आघाडीचे आमदार म्हणून गेले दोन वर्षे मिरवत आहेत. पण महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांना आणि कार्यकर्त्यांना वेळोवेळी डावलून अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे.
तसेच कुठल्याही कार्यक्रमात अथवा विकास कामांच्या बाबतीत विश्वासात घेतले जात नाही, असेच जर पुढील काळात होत असेल तर कर्जत तालुका शिवसेना भविष्यात आपली ताकद दाखवून देईल, असे प्रतिपादन शिवसैनिकांनी यावेळी केले.