अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- निवडणूक विषयक कामात जिल्हा निवडणूक शाखेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व कामाचे नेतृत्व सांभाळणारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ‘उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी’ म्हणून डॉ. भोसले यांच्या नावाची घोषणा केली.
नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, या पुरस्काराचे श्रेय हे सर्वस्वी जिल्हा निवडणूक शाखा,जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी,
निवडणूक नायब तहसीलदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यासह मतदार यादी विषयक विविध उपक्रम याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येकजणाचे आहे.
संसदीय व विधिमंडळ निवडणुकांचे संचालन करण्याची जबाबदारी स्वतंत्र भारतात भारत निवडणूक आयोग सांभाळत आहे. लोकशाही प्रणाली स्वीकारल्यानंतर पंचवार्षिक निवडणुकीद्वारेच लोकप्रतिनिधींची निवड आणि त्याद्वारे केंद्र व राज्य सरकार निवड होते.
पंचवार्षिक निवडणुकीची ही महत्वपूर्ण प्रक्रिया भारत निवडणूक आयोगामार्फत राबवली जाते. दि.२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.