अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- महात्मा फुले विकास महामंडळ मार्फत एनएसएफडीसी चे जिल्ह्यातील दोन वर्षापासून मंजूर असलेली प्रकरणासाठी तात्काळ कर्जपुरवठा करुन बेरोजगार युवकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील लाभार्थींना 15 दिवसाच्या आत कर्ज पुरवठा न झाल्यास आरपीआयच्या वतीने 13 डिसेंबर रोजी महात्मा फुले विकास महामंडळास टाळे ठोकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर मागणीचे निवेदन आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, विवेक भिंगारदिवे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु,
नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, वाल्मिक नरवडे, सागर कांबळे, कृपाल भिंगारदिवे, सुभाष साबळे, अरुण खर्चन, सतीश साळवे, सुषमा शिदे, आशा शिंदे, संगीता साठे, उषा शिंदे आदी उपस्थित होते. राज्यामध्ये निवडणुकीच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाने मागासवर्गीयांना वेगवेगळे आमिष दाखवून मते घेतली.
मात्र मागासवर्गीयांच्या महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, चर्मोद्योग विकास महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ या महामंडळांना निधी देताना जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली असल्याचा आरोप करुन आरपीआयच्या वतीने सदर प्रकरणी निषेध नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मागासवर्गीय कुटुंबातील युवकांना रोजगार उपलब्ध करण्याकरिता सदर महामंडळाच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा करण्याची गरज आहे. महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांच्या विविध महामंडळाचे कर्जाचे प्रस्ताव स्वीकारले असून, त्याची पुर्तता मागासवर्गीय सुशिक्षित,
बेरोजगार, महिला व पुरुष लाभार्थींनी अर्ज दाखल करणे, सरकारी जामीन देणे, व्यवसायासाठी दुकान भाड्याने घेणे, मॉरगेज करून देणे, जागेवर बोजा चढविणे आदी कामांसाठी अनेकवेळा कार्यालयात चकरा मारण्यास भाग पाडले जात आहे.
महात्मा फुले विकास मंडळ अहमदनगर कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापकाने आतापर्यंत सर्व प्रकरणाची पूर्तता करून जिल्ह्यातील किमान चार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करून त्याची पूर्तता करूनही कर्ज वितरण केलेले नाही. लाभार्थ्यांना वारंवार चकरा मारुन देखील कर्ज मिळत नसून,
संबंधित अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महात्मा फुले विकास महामंडळ मार्फत एनएसएफडीसी चे जिल्ह्यातील दोन वर्षापासून मंजूर असलेली प्रकरणासाठी तात्काळ कर्जपुरवठा व्हावा, जिल्ह्यातील लाभार्थींना 15 दिवसाच्या आत कर्ज पुरवठा करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.