Ahmednagar News : मोठा पाऊस झालेला नसला तरी सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. हे वातावरण झाडांना पोषक असते. त्यामुळे झाडांची रोपे खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. फळझाडांबरोबरच फुलझाडांनाही पसंती मिळत आहे.
पावसाळा सुरु झाला असला तरी सध्या नगर जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरणी होऊन एक महिना होत आला असताना पावसाअभावी काही ठिकाणी दुबार पेरणीची चिन्हे दिसू लागली आहेत.
तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस व जमीन, झाडांची पाने ओली होण्याजोगा पाऊस पडत असल्यामुळे पिकांना जीवदान मिळत आहे. अशातच ज्या भागात पाणी उपलब्ध आहे त्या भागात शेतकरी फळ झाडे लावण्यात मग्न आहे. तर उन्हाळ्यातील खराब, कुजलेली घरगुती शोभिवंत झाडे काढून अंगणात नवीन झाडे लावणारे निसर्गप्रेमी झाडे खरेदीसाठी नर्सरीमध्ये गर्दी करत आहेत.
आंबा, रोपे, पेरू, चिकू, सीताफळ, डाळिंब, औषधी रोपे व इतर फळे व फुलझाडांबरोबर बहुतेक शेतकरी नवीन पीक घेण्यास उत्सुक झाले आहेत. याबरोबरच घराच्या अंगणात व परिसरातील बगीचा असलेल्या जागेत मोगरा, गुलाब, जासवंद, कनेर, ड्रायसेना, आरेपाल्म, बॉटलपाल्म, फॉक्सटेलपाल्म, लॉन आदींची लागवड निसर्गप्रेमी करत आहे.