Ahmednagar News : देशातील नंबर दोनच्या श्रीमंत देवस्थान म्हणून नावलौकिक मिळविलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास ठेवी पोहचलेल्या आहेत. तसेच दानपेटीत विविध प्रकारचे दान जमा होत आहे.
त्यात आता बख्खळ जागेनंतर इमारत दान करणाऱ्या भाविकांची कमी नाही. दिल्ली येथील साईभक्त गितिका सहानी यांनी आपल्या मालकीचा १८ लाख २४ हजार रुपये किंमतीचा फ्लॅट साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला आहे.
सातासमुद्रापार महती पोहचलेल्या श्री साईबाबा संस्थानकडे भाविकांच्या दानातून वर्षाकाठी करोडो रुपये संस्थानच्या तिजोरीत जमा झाले आहेत. पैसे, सोने, चांदी, मौल्यवान वस्तू यापाठोपाठ आता शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानला दान स्वरूपात जमीन आणी फ्लॅटदेखील दिले जात आहेत.
यापूर्वी शामला माकाम यांनी त्यांच्या मालकीची राहाता येथील साडेतीन गुंठे क्षेत्रफळातील दोन हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेली सुमारे ५० लाख रुपये किंमतीची इमारत शैक्षणिक कामासाठी साईबाबा संस्थानला दान केली आहे.
त्यानंतर आता दिल्ली येथील साईभक्त गितीका सहानी यांनी त्यांच्या मालकीचा शिर्डी येथील एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २१ चे क्षेत्र ५१.०९ चौरस मीटर मिळकत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांना
नोंदणीकृत दानपत्राद्वारे देणगी स्वरूपात दिली आहे. ही मिळकतीची किंमत १८ लाख २४ हजार इतकी आहे.