अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दर्शनासाठी सशुल्क पासची सोय करण्यात आली आहे.
मात्र सशुल्क पासेसच्या धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पासेसचा आता धंदा होऊ लागला आहे. २०० रुपयांचा पास हजारो रुपयांना विकल्याचा प्रकार घडत आहे.
यामुळे साईभक्तांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी दर्शनाकरिता संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरून व दर्शन पास वितरण काऊंटरवरुनच दर्शन पासेस घ्यावेत.
इतरत्र खाजगी व्यक्तीकडून अथवा संकेतस्थळावरून दर्शन पासेस घेऊ नयेत. असे पास घेणे अनुचित असून ते वैध देखील नाहीत. फ्री पासेस किंवा ऑनलाईन पासेस हे ओळखपत्र किंवा भक्तांच्या फोटोसह असतात.
त्यामुळे आपली फसवणूक होणार आहे. असे दलाल आपले लक्षात आल्यास त्याची माहिती खालील कंट्रोल रुम तसेच हेल्पलाईनवर देण्यात यावी, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्यावतीने करण्यात आलेली आहे.
साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाकरिता online.sai.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी. साईभक्तांनी शिर्डी येथे येण्यापूर्वी व आल्यानंतर निवास, भोजन, वैद्यकीय सेवा, देणगी व दर्शनाची परिपूर्ण माहिती करिता व आपली फसवणूक टाळण्यासाठी संस्थानचे हेल्पलाईन मोबाईल नंबर अथवा अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.