अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिर्डी मधील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. यामुळे भाविक साईंच्या दर्शनापासून वंचित राहिले होते.
मात्र आता साईभक्तांसाठी एक महत्वाची आनंददायक माहिती समोर येत आहे. येत्या 7 ऑक्टोंबर पासून श्री.साईबाबा मंदिर सुरू होणार आहे. धार्मिकस्थळे सुरू करावयाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उपविभागीय बैठक साईबाबा संस्थानच्या सभागृहात संपन्न झाली.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी बोलताना सीईओ बानायत म्हणाल्या कि, कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी राहाता व शिर्डी मधील महसूल,
पोलिस, आरोग्य, बांधकाम, नगरपालिका, रेल्वे, एस.टी, विमानतळ व इतर सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामकाज करावे आणि कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
”प्रशासनाने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाले पाहिजे. प्रत्येकाने 6 फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलीतील मुख्य तीन नियमांचे पालन भाविक व नागरिकांकडून झाले पाहिजे.
यासाठी प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. अशावेळी जे नियमावलीचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कार्यवाही करावी.