अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- शिर्डीचे साईबाबा अनेकांचे दैवत आहेत. जगभरात त्यांचे भक्त आहेत. अनेक ठिकाणी साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जाती, धर्मांचे लोकं आहेत.
बाबांचे अनेक असे चमत्कार आहेत, जे आपल्याला विविध माध्यमातून ऐकयला मिळाले किंवा समजले. असाच चमत्कार इंदोरमधील एका परिवारासोबत झालाय असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. कारण शिर्डीतून भाविक बेपत्ता होण्याचं प्रकरण ज्या महिलेमुळे समोर आलं ती महिला तब्बल साडेतीन वर्षांनंतर सापडली आहे.
इंदूर येथील दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ता झाल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत फटकारलं होतं. आणि शिर्डी शहरात मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का,
या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना दिले होते. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि, 38 वर्षीय दीप्ती सोनी पती मनोज सोनी (वय 42 वर्ष) आणि मुलांसह 2017 मध्ये इंदूरहून शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. दीप्ती सोनी गुरुवारी (17 डिसेंबर) संध्याकाळी इंदूरमधील बहिणीच्या घरी परतल्या, अशी माहिती मनोज सोनी यांचे वकील सुशांत दीक्षित यांनी दिली. दीप्ती सोनी सापडल्याची माहिती कोर्टाला देण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (18 डिसेंबर) सोनी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी झाली.
कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, “दीप्ती सोनी कुटुंबासह 10 ऑगस्ट 2017 रोजी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेव्हा तिथून त्या बेपत्ता झाल्या. अखेर तीन वर्ष चार महिन्यांनी त्या गुरुवारी म्हणजेच 17 डिसेंबर रोजी इंदूरमधील बहिणीच्या घरी सुखरुप परतल्या.
मनोज सोनी यांच्या सासऱ्यांनी त्यांना फोन करुन दीप्ती बहिणीच्या घरी परत आल्याचं कळवलं. दिप्ती तीन वर्षांपासून इंदूरमध्येच राहत होत्या आणि मनोज यांच्या सासऱ्यांना त्या सापडल्या.मी बडोद्यात ड्युटीवर होतो तेव्हा मला सासऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दीप्ती गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तिच्या बहिणीच्या घरी परतल्या आहेत.
मी तिथून लगेच इंदूरला आलो आणि रात्री सव्वाबारा वाजता तिला भेटलो. ती मागील साडेतीन वर्षे नेमकी कोणत्या ठिकाणी होती, याबाबत तिने स्पष्ट सांगितलं नाही. ती म्हणाली की, शिर्डीच्या साई मंदिराबाहेरच्या दुकानात गेली असता ती तिथे चक्कर येऊन पडली. त्यानंतर तिला पुढचं काहीच आठवत नाही.
ती परत आली हाच आमच्यासाठी मोठा दिलासा आहे. मागील साडेतीन वर्षे आमच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण होती,” असं मनोज सोनी यांनी सांगितलं.तर दीप्ती सोनी यांनी कुटुंबीयांना सांगितलं की, “त्या एका वृद्ध महिलेसह इंदूरमध्येच राहत होत्या.” “पण शिर्डीतून इंदूरमध्ये कशा परत आल्या हे त्यांना सांगता आलं नाही,” असं मनोज सोनी यांनी सांगितलं.
औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलिसांनी दाखल केलेला संपूर्ण तपासाचा 200 पानी अहवाल निरर्थक ठरवला आहे. कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नाही, असं न्यायालयाने म्हटलं.
मात्र मानवी तस्करीबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरु केला आहे, असं उत्तर यावर पोलिसांनी दिलं.