शिर्डीतील साईमंदिर आजपासून भाविकांसाठी दर्शन करिता खुले ! या नियमांचे पालन करणे बंधनकारक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल शिर्डी येथील साई मंदिर अखेर आजपासून खुले होणार आहे. शिर्डीतील साईमंदिर ठिकाणी दररोज पंधरा हजार भाविकांना कोविड नियमांचे पालन करत साईदर्शन घेता येणार आहे,

अशी माहिती साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. नित्याच्या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले झालं असुन,

सकाळी सहा ते रात्री दहा यावेळेत मंदिर खुले राहणार आहे. साईभक्‍तांना साईंच्या दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पास आरक्षण करावे लागणार आहे. या पासेस बुकिंग करीता संस्‍थानच्‍या सर्व निवासस्‍थान येथे काऊंटरची व्‍यवस्‍था केलेली आहे.

गर्दी टाळण्‍याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्‍याची पालखी बंद राहणार आहे. या बरोबरच मंदिरातील साई सत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा, ध्‍यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील.

दर्शनासाठी भाविकांना दोन क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल. द्वारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे चार व पाच नंबर दरवाजातून बाहेर पाठविले जाईल.

या नियमांचे पालन करणे बंधनकारक

प्रत्‍येक तासाला 1150 साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल.

प्रत्‍येक आरतीकरीता एकूण 80 साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येईल, त्‍यापैकी प्रत्‍येक आरतीस प्रथम येणाऱ्या शिर्डी ग्रामस्‍थांना दहा पासेस देण्‍यात येतील.

ग्रामस्‍थांना दहा आरती पासेस हे साई उद्यान निवासस्‍थान येथून तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील १६ गुंठे शताब्‍दी मं‍डप येथील काऊंटरवर दिले जाणार आहे.