अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-मकर संक्रातीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी पतंग उडविण्यासाठी अनेकजण नायलॉन मांजाचा वापर करतात.
घातक असलेल्या अशा नायलॉन मांजावर प्रशासनाने बंदी घातली आहे. बंदी असलेल्या या मांजाची विक्री केली जाऊ नये यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे.
दरम्यान आज पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी छापेमारी करून सुमारे 26 हजार रुपयांचा बंदी असलेला मांंजा जप्त करुन एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी बंदी असलेला मांजा न वापरण्याचे आवाहन करताना अशा पद्धतीचा मांजा कोणी विकताना आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.
दरम्यान शहरातील कुंभार आळा व मालदाड रोड या दोन भागातील पतंग विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात बंदी असलेला नायलॉन व चायनीज मांजा आढळून आला. तो संपूर्ण मांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी रुकैया शमशुद्दीन तांबोळी (वय 60 वर्ष. रा. कुंभार आळा) व अमोल सुभाष म्हस्के (वय 31 वर्ष. रा. मालदार रोड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही ठिकाणाहून 25 हजार 700 रुपये किंंमतीचा नायलॉन व चायनीज मांजा जप्त केला आहे.