अहमदनगरमध्ये बनावट कागदपत्रे करून प्लॉटची विक्री; यांच्यावर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची विक्री करणार्‍या चौघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

गंगाधर रावसाहेब खंडागळे (रा. कवडेगल्ली, नालेगाव), सोमनाथ संगाजी भंडारे (रा. भावनाऋषी सोसायटी, अहमदनगर), संजय मनोहर देवकर (रा. चितळेरोड, अहमदनगर), प्रविण अशोक झिंजे (रा. भराडगल्ली, तोफखाना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी गणेश नारायण वामन (वय 40 रा. वारूळाचा मारूती मंदिर रोड, नालेगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदरचा गुन्हा 29 जुलै 2019 ते 6 मार्च 2020 दरम्यान घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नालेगाव येथील कल्याण रोडवर भावनाऋषी सहकारी गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीतील सर्व्ह नंबर 238/1, 238/2, 239 मधील प्लॉट 64, 65, 66 चे मुळे मालक रमेश भुमय्या कुरापाटी हे असल्याचे माहित असताना देखील भावनाऋषी सोसायटीचे चेअरमन गंगाधर खंडागळे,

सेक्रेटरी सोमनाथ भंडारे, संजय देवकर, प्रविण झिंजे यांनी परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून सोनाली राजेंद्र मोरे, जयश्री सुनील मोरे यांना विक्री केली. त्यांच्याकडून सदरचे प्लॉट गणेश वामन यांनी खरेदी केले. वामन यांनी प्लॉटची खरेदी केल्यानंतर प्लॉट विक्रीची बनावटगिरी त्यांच्या लक्षात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान हा सर्व प्रकार वामन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावरून आता तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्‍वास भान्सी करीत आहे.