अहमदनगर बातम्या

सह्याद्री मल्टिसिटी फायनान्सचे चेअरमन व दैनिक अजिंक्य भारतचे संपादक संदीप थोरात यांची बदनामी करणाऱ्यावर 2 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar News :- सह्याद्री मल्टीसीटी फायनान्सचे चेअरमन आणि दैनिक ‘अजिंक्य भारत’चे संपादक संदीप थोरात यांची गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक आणि व्हॉटस्‌‍ ॲप अशा सोशल मीडियावर बदनामी सुरू आहे. अकोल्यातील अमोल इंगळे या व्यक्तिने पोस्ट बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यामुळे अमोल इंगळेविरोधात दोन कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करण्यात आला आहे.

अमोल इंगळे नामक व्यक्ति अजिंक्य भारतच्या अकोला आवृत्तीत ‘ऑपरेटर’ म्हणून काम करत होता. एके दिवशी रात्री 9 वाजता त्याने यथेच्छ मद्यपान करून कार्यालयात धिंगाणा घातला. कार्यालयीन शिस्त मोडली म्हणून त्याला कार्यालयामधून बाहेर काढण्यात आले. या सर्व प्रकारामुळे इतर सहकारी कर्मचारी गडबडून घरी गेले. कार्यालयामधून बाहेर काढल्याचा राग मनात धरुन त्याने संस्थेची बदनामी सुरू केली.

तसेच इंगळे याने अकोला कामगार आयुक्त कार्यालयात पगार मिळाला नाही, म्हणून तक्रार केली आहे. मात्र संदीप थोरात यांची बदनामी कर, त्यांना ब्लॅकमेल कर, असा सल्लाही त्याला एका व्यक्तीने दिला. हा सल्ला दिल्याचे रेकॉर्डिंग देखील ‘अजिंक्य भारत’ कार्यालयाकडे उपलब्ध आहे.

याच व्यक्तिने संदीप थोरात यांच्याकडे एका व्यक्तीमार्फत निरोप पाठवून 3 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली होती. मात्र संदीप थोरात यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, काही कारणांस्तव ‘अजिंक्य भारत’ची अकोला आवृत्ती बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापने घेतला. मात्र कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू नये, हा सकारात्मक विचार करून 1 महिन्याचा पगार सर्व कर्मचाऱ्यांना घरी बसून देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.

तसेच वितरण, जाहिरात, इतर विविध बिलांची वसुली आगामी 3 महिन्यांत करुन सर्व कर्मचाऱ्यांचे पगार 3 महिन्यांनी करण्याचे ठरले होते. या निर्णयास सर्व कर्मचाऱ्यांची संमती देखील आहे. त्यानुसार जून महिन्याच्या अंतिम तारखेपर्यंत पगार करण्याचे ठरले होते. मात्र इंगळे याने स्पर्धक व्यक्तींचे ऐकून ब्लॅकमेल करुन संदीप थोरात यांची सोशल मीडियावर बदनामी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अमोल इंगळे यांच्याविरुद्ध संदीप थोरात यांनी 2 कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा केला आहे.

संदीप थोरात यांच्या बदनामीची पोस्ट व्हायरल करणाऱ्या इंगळेवर 2 कोटींचा मानहानीचा दावा करण्यात आला आहे. ही पोस्ट कोणीही सोशल मीडियावर व्हायरल करू नये. तसेच स्टेटस ठेवू नये, अन्यथा संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर अब्रु नुकसान, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल. आज नगरमधील दोन नामांकित व्यक्तींविरोधात फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. -अविनाश कराळे जनरल मॅनेजर, दैनिक अजिंक्य भारत.

इंगळे यांनी संदीप थोरात यांच्या केलेल्या बदनामीमध्ये काहीही तथ्य नाही. या व्यक्तीचा किरकोळ पगार देणेे बाकी असेलही. मात्र ब्लॅकमेल करुन पैसे मिळत नाहीत म्हटल्यावर त्याने बदनामी सुरू केली. व्यवस्थापनाने पगाराबाबत ठरवलेले नियम, तसेच मार्केटमधील जाहिरातींपोटी राहिलेली वसुली झाल्यानंतर पगार करण्यात येणार असल्याचे माझ्यासह सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना मान्य आहेच. व्यवस्थापनाने शब्द दिल्याप्रमाणे पगार होणार आहेत. आम्ही सर्व कर्मचारी, संपादक संदीप थोरात यांच्या पाठीशी उभे आहोत. – नीलेश पोटे.

आवृत्तीप्रमुख, अकोला.

मी स्वतः सह्याद्री उद्योग समुहात गेल्या 3 वर्षांपासून मुख्य पदावर काम करत आहे. आमच्या उद्योग समुहात 376 कर्मचारी काम करतात. त्यापैकी सह्याद्री फायनान्समध्ये 175 कर्मचारी आहेत. विनाकारण कोणाचा पगार दिला नाही, असे कधीही झाले नाही. उलटपक्षी सर्व कर्मचाऱ्यांना वाढदिवसाला पूर्ण वेळ सुट्टी, वर्षातून एकदा कंपनीतर्फे ट्रीप अशा कोणतीही कंपनी देत नसलेल्या सुविधा आम्ही देत आहोत. मात्र विनाकारण कोणी बदनामी करत असेल, तर आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू. सह्याद्री फायनान्स ही महाराष्ट्रात नावाजलेली फायनान्स कंपनी आहे. काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी मुद्दाम कंपनीची बदनामी व्हावी म्हणून बदनामीच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. आम्ही आज अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू केल्या आहेत. तसेच अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. – ईश्वर मचे

सीईओ, सह्याद्री फायनान्स.
अहमदनगर लाईव्ह 24