सुनेने दिला सासूच्या पार्थिवाला अग्निडाग !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- येथील प्रसिद्ध वकील प्रदीप मालपाणी यांच्या मातोश्री व वकील ज्योती मालपाणी यांच्या सासू माजी मुख्याध्यापिका सरोजदेवी राजेंद्र मालपाणी (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवाला अग्नी डाग त्यांच्या स्नुषा ज्योती यांनी दिला.

मालपाणी परिवाराच्या वतीने दशक्रियाविधी, अकरावा, बारावा आदी विधींना फाटा देत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मोठी रक्कम दिली आहे. या उपक्रमाचे अनेकांनी याचे स्वागत केले आहे.

सरोजदेवी मालपाणी यांचा जन्म संगमनेर येथे २३ एप्रिल १९२७ रोजी झाला. दहावीच्या शिक्षणासाठी त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी हे त्या ठिकाणी तीन दिवस आले होते. तेव्हा दररोज संध्याकाळी महात्मा गांधी हे फिरण्यासाठी जात असे. त्यावेळी गांधी हे सरोजदेवी यांनाही सोबत फिरण्यासाठी घेवून जात.

यावेळी महात्मा गांधी यांच्याकडून सरोज देवी यांना खूप काही शिकायला मिळाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमरावती येथील राजेंद्र मालपाणी यांच्याशी त्यांचा विवाह.

यावेळी त्यांना अमरावती येथील श्री ब्रिजलाल बिहाणी शिक्षा समिती संचालित रघुनाथमल कोचर बालक मंदिर व सावित्रीबाई बिहाणी विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी लागली. त्यांनतर त्या मुख्याध्यापिका झाल्या.

विनोबा भावे, प्रा. ठाकूर दास बंग, नारायण दास जाजु – यमुना देवी, दादा धर्माधिकारी व अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे या सर्वांना त्या आदर्श मानत होत्या. आपल्या पदातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी देश-विदेशामध्ये भ्रमणही केले.

वाचन व लिखाणाची आवड होती. चारही मुलांना चांगले शिक्षण देवून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. आज चौघेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करतात. दहा वर्षांपूर्वी त्या मोठा मुलगा प्रदीप मालपाणी व स्नुषा ज्योती यांच्याकडे संगमनेर येथे आल्या.

गेल्या दहा वर्षांपासून ज्योती यांनी सासू सरोजदेवी यांची मनोभावे सेवा केली. मालपाणी परिवारात त्यांना राणी सरकार म्हणून हाक मारायचे. अखेर गुरुवारी, दि. २३ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात वकील प्रदीप, दर्शन, डॉ. किशोर व सुनील असे चार मुले, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतांना वकील प्रदीप मालपाणी यांनी पुढे येत पत्नी ज्योती यांना आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यास सांगितले.

ज्योती यांचेही सासू सरोज देवी यांच्या सोबत मैत्रीणीसारखे संबंध होते. अखेर त्यांनी सासू सरोज देवी यांना अग्निडाग दिला. मालपाणी परिवाराच्या वतीने दशक्रियाविधी, अकरावा, बारावा आदी विधींना फाटा देत स्व. सरोजदेवी यांच्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मोठी रक्कम दिली आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24