अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू होणाऱ्या रुग्णालयास इमारतीतील रहिवाशांनी विरोध केला आहे. नगरपालिकेने या रुग्णालयास परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरात एका वैद्यकीय व्यावसायिकाने त्यांचे बाल रुग्णालय त्रयस्थ व्यक्तिस भाड्याने दिलेले आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावर काही व्यावसायिक गाळे आहेत.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हॉस्पिटल आहे. ही इमारत रहिवासी स्वरूपाची असून इमारतीमध्ये नवीन रुग्णालय सुरू होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच नागरिकांच्या मनात भीती असताना या रुग्णालयांमध्ये इमारतींमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणी होणाऱ्या रुग्णालयास परवानगी देऊ नये,
अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान याबाबत संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना रहिवाश्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
नियोजित रुग्णालय हे बेकायदेशीर असून नगरपालिकेने या रुग्णालयास परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.