नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात अंगणवाडी केंद्रामध्ये मुदत संपलेल्या आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचो समोर आले आहे. याबाबत येथील सरपंच शरद पवार यांनी या गंभीर प्रकाराची पोलखोल केली आहे.
तरी या आहारामुळे चिचोंडी पाटील व आठवड या दोन गावात निष्पाप बालकांना,मातांना विषबाधा होऊन अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निवेदनाव्दारे केली आहे.
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात गरोदर स्रिया, स्तनदा माता व किशोरयीन मुलींना तसेच तीन वर्षापर्यंतच्या बालकांना वाटप करण्यात येणारा पोषण आहार हा फेडरेनकडून वाटप करण्यात येतो.
मात्र नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील व आठवड या गावांमध्ये एकूण ११ अंगणवाडी केंद्र असून या अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार वाटपाचे कंत्राट ब्रम्हचैतन्य महिला बचत गटाकडे देण्यात आलेले आहे.
अंगणवाडी केंद्रामध्ये दोन महिन्यांचा आहार पाठवला आहे. मात्र या काही आहाराच्या पुड्यांवरील तारीख संपलेली आहे. तसेच सदर पुड्यांमधील पोषण आहार हा एकात्मीक बालविकास योजनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार नाही.
या पाकीटावर आहार तयार केल्याची दि.२३ / ११ / २०२३ असून त्याखाली सदर आहार फक्त तयार दिनांकापासून दोन महिने कालावधीत खाण्यासाठी योग्य आहे, असे नमुद असताना देखील हा आहार आज दि.५ / ०२ / २०२४ रोजी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. याबाबत गावातील अनेक लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून याची लेखी तक्रार देखील केलेली आहे.
वास्तविक पाहता हा ब्रम्हचैतन्य महिला बचत गट हा फक्त कागदोपत्री अस्तित्वात असून, हा बचत गट गावातील एक माहिती अधिकार कार्यकर्ता चालवत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सरपंच पवार यांनी नमूद केले आहे.
सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सदर आहाराचे वाटप तात्काळ थांबवावे. सदर पोषण आहाराचे अन्न व औषध प्रशानामार्फत परीक्षण व्हावे. जेणेकरून हा आहार खाण्यास योग्य आहे की अयोग्य हे सिद्ध होईल. तरी याबाबत गांभिर्याने दखल घेऊन दोषींवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी केली आहे.
सदर आहार या गावातील कुठलेच लाभार्थी खात नाहीत. तो जनावरांना खुराक म्हणून खाऊ घालतात. जनावरेसुद्धा सदर खुराक (आहार) खाल्यानंतर रवंथ करत नाहीत. जनावरांनासुद्धा जुलाब होतात. इतका निकृष्ठ दर्जाचा आहार या दोन गावांत सदर व्यक्तीकडून वाटप करण्यात येत आहे.
काही अंगणवाडी केंद्रात सदर आहाराच्या पॅकेटवर वाटप केल्यानंतर हा व्यक्ती अंगणवाडी केंद्रामध्ये येऊन महिला बचत गटाचे शिक्के व आहार तयार केलेल्या तारखेचे २०२४ चे शिक्के मारत असल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनिस, विद्यार्थी पालक यांनी सांगितले आहे. यावरून हा आहार कित्येक महिन्यांपूर्वी तयार केलेला असावा अशी शंका आहे.