Ahmednagar News : लग्न ही आपल्या संस्कृतीमधील पवित्र गोष्ट. लग्न म्हणजे एक संस्कार असतो. या संस्काराच्या बंधनात संपूर्ण आयुष्य पती पत्नीस एकमेकांसाठी सहजीवीत कारण लागत. एक पत्नी काय करू शकते,
तिची पतिव्रता काय किमया करू शकते याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या इतिहासात पाहायला मिळतील. सती सावित्रीचे उदाहरण तर अजरामर आहे. पण आजच्या कलियुगातही जर अशी सतीसावित्री असेल तर ? वाचून थोडं गोंधळात पडाल पण अहमदनगर जिल्ह्यात सोनाली नावाच्या महिलेनं जो पत्नीधर्म निभावला तो पाहून तुमचं काळीज देखील थक्क होईल.
अहमदनगरच्या सोनाली आणि विशाल वाघमारे यांचे लग्न होऊन काहीच वर्ष झालेले. अचानक विशालवर संकट ओढवलं. त्याला अशा आजारानं घेरलं की तो असून नसल्यासारखा झाला. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी दुरावले, पण…त्यानंतर सोनालीने जे केलं ते वाखाणण्यासारखंच आहे.
सोनाली आणि विशाल वाघमारे यांनी 2011 मध्ये लग्न केले होते. विशाल एका फायनान्स कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता. सोनाली गृहिणी होती. 2018 मध्ये सोनाली आणि विशाल आनंदात राहत असताना विशालला ब्रेन अटॅक आला आणि तो बेडवर पडला, तो कायमचाच. विशालला ब्रेन अटॅक आला आणि त्याला अर्धांगवायू झाला. पूर्वीसारखं बोलता येत नाही हे लक्षात येताच जवळचे नातेवाईक निघून गेले, मित्रही विभक्त झाले. सगळं संपलं होत.
नव्या घराचं स्वप्न…
सोनाली विशालच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. ती आता त्याची आई झाली होती. अगदी लहान वयात आणि कोणतेही व्यावहारिक ज्ञान नसताना सोनालीने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली. विशालला ब्रेन अटॅक येण्यापूर्वीच त्याच्या नव्या घराचे काम सुरू झाले होते.
नवीन घराचे स्वप्न पाहत असताना ही घटना घडली आणि पुढील आयुष्य मोठ्या आनंदाने जगायचे असताना विशालला स्ट्रेचरवर या घरात आणावे लागले. त्यानंतर सोनालीची खरी परीक्षा सुरू झाली. बाकीच्या लोकांनी ‘तुझे वय अजून आहे तरी तू वेगळा विचार करायला हवास’ असा सल्ला दिला. सोनालीने मात्र अशा अवस्थेत मी पतीला सोडणार नाही अशी भूमिका घेतली. लहान बाळाप्रमाणे ती विशालची काळजी घेते.
कोरोनाच्या काळातील सत्वपरीक्षा
घरातल्या नोकरदार माणसाच्या या अवस्थेमुळे सगळी जबाबदारी सोनालीवर आली. सुरवातीला सोनालीने मेस सुरू केली, शिवणकामाचे काम केले. पण कोरोना काळात तो व्यवसायही बंद करावा लागला. या दरम्यान विशालला कोरोना झाला. अन सोनालीची सत्वपरीक्षा सुरु झाली.
कोरोना काळात त्याच्या जवळ कोणीही न आल्याने विशालला अशा अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इतरांप्रमाणे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून सोनालीने घरी यायला हव होत. पण विशाल पॉझिटिव्ह येण्याआधी त्याला अर्धांगवायू झाला आहे,
त्याला चालता येत नाही अशा अवस्थेत सोनाली त्याला एकटं सोडण्याची कल्पनाही करू शकत नव्हती. सोनालीने डॉक्टरांना सांगितले की, मी त्यांच्यासोबत राहीन आणि तिने डॉक्टरांना लिहून दिल की, ‘पेशंटसोबत माझे काही बरे वाईट झाल्यास, त्याला मी जबाबदार असेल’. तिने विशालची सेवा केली. तिने विशालला कोरोनासारख्या मृत्यूच्या दाढेतूनही मागे आणले.
शिक्षण घेतलं, नोकरी केली व शेतीही पाहिली
कोरोना काळात मेस बंद झाल्याने पुढे काय करावे, असा प्रश्न सोनालीला पडला. B.Sc. बी.एड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आणि स्वत: घरात अभ्यास सुरू केला. तिने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नोकरी सूर केली. यासोबतच सोनालीने विशालच्या वडिलांच्या मालकीची चार एकर शेती ही सांभाळायला सुरु केली. सोनालीला जेव्हा जेव्हा नोकरीसाठी बाहेर जावे लागते तेव्हा तिची आई पार्वती भवर विशालची काळजी घेण्यासाठी येतात.
सोनाली नवऱ्याची आई झाली
शाळेची नोकरी, शेती, अभ्यासिका यांचे नियोजन करत ती विशालची आईप्रमाणे काळजी घेते. नवरा हा केवळ घरात पैसे कमावून आणणारा व नेहमीच फिट असणारा असावा अशी बायकांनी घालून घेतलेली चौकट तिने मोडीत काढली. विशाल जसा आहे तसा फक्त माझ्यासोबत आहे यातच माझं समाधान असल्याचे सोनाली सांगते. खऱ्या अर्थाने सोनाली ही आजच्या काळातील सती सावित्री आहे.