अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतातील पिकांना जीवदान

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मिरजगावसह परिसरात शनिवारी दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावल्याने पावसाची रिपरिप चालू होती. परिसरात बहुतांश भागात मागील दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतातील कडवळ, तूर, कांदा, बाजरी, मका या वाया गेलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.

ऐन गणेशोत्सव कालावधीत पावसाने हजेरी लावल्याने मागील काही दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

मिरजगाव शहरासह कोंभळी, मांदळी, चांदे बु, निमगाव गांगर्डा, गुरवपिंप्री, बाभुळगाव खालसा, रवळगाव, थेरगाव, नागलवाडी आदी भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस होत असल्याने मिरजगाव शहरात व परिसरातील शेतात ठिकठिकाणी पाणी साचलेले दिसत होते.

गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिली होती. बऱ्याच कालावधीनंतर पाऊस पडल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा पडत असलेला पाऊस शेतातील पिकांसाठी संजीवनी ठरला आहे.

मात्र आणखी पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात प्रशासनाकडून पुढील दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह- वादळी वारा व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगून सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office