पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशावरून गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी दुपारी मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.
वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी राहुरी, नगर, पाथर्डी व नेवासे येथील लाभधारक शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन मागणी केली होती. विखे पाटील यांच्या सूचनेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे.
वांबोरी चारीला पाणी सोडण्यासाठी उपलब्ध असलेल्या चार विद्युतपंपापैकी दोन विद्युत पंप चालू स्थितीत, तर एक विद्युत पंप गेल्या पाच वर्षांपासून नादुरुस्त आहे. चौथा विद्युत पंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे.
विद्युत पंपाचे काम करणाऱ्यांनी ही माहिती यांत्रिक विभाग व हायड्रोलिक नाशिक विभाग यांना कळवल्याने बंद अवस्थेतील पंपाचे दुरुस्ती काम सुरू आहे. ८ ऑगस्टला वांबोरी चारीला सुटणारे पाण्याचे रोटेशन १०० दिवसांसाठी असून या रोटेशनमध्ये ३५०० हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ होणार आहे. सध्या मुळा
धरणाचा पाणीसाठा २० हजार ६०० दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला असून वांबोरी चारीला पाणी सोडण्यासाठी मुळा धरणात १४ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाण्याची उपलब्ध आवश्यक असल्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे.
वांबोरी चारीच्या लाभधारक शेतकऱ्यांकडे ५ कोटी ३१ लाख रुपये पाणीपट्टीची तसेच वीजपंपाची १ कोटी २४ लाख रुपये थकबाकी असल्याने पाणीपट्टीची थकबाकी भरून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पाटील यांनी केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशावरून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याने बॅटऱ्या चार्जिंग करण्याचे काम सुरू आहे. बॅटऱ्या चार्जिंगचे कामासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी किमान ९५.७१ टक्के पाणीसाठा धरणात उपलब्ध होणे गरजेचे आहे.
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ८७.८९ टक्के पाणी साठा होणे आवश्यक आहे. १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान ९५.७१ टक्के पाणीसाठा धरणात उपलब्ध झाल्यानंतर मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले. दरम्यान, वांबोरी चारीला पाणी सुटणार असल्याने वांबोरी चारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.