अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्न असलेला पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन,
भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन केला जाणार आहे.
ही रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकार व रेल्वे विभागाला जाग आनण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, आर्किटेक अर्शद शेख व सुहास मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे.
दौंड पासून तीन कि.मी. अगोदर दौंड रेल्वे बायपास येथे रेल्वे विभागाच्या वतीने सप्टेंबर 2019 मध्ये कॉड लाईनचे काम पुर्ण करण्यात आले. या कामासाठी अडीच हेक्टर जमीन अधिग्रहण करुन 30 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे काम झाल्यानंतर पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सुरु होणे अपेक्षित होते. तसे आश्वासन देखील रेल्वे विभागाने दिले होते.
मात्र तब्बल सव्वा वर्ष लोटून देखील ही रेल्वे सेवा सुरु करण्यात आलेली नाही. दौंड येथील कॉड लाईनचे काम पुर्ण झाल्याने पुणे, नागपूर व कलकत्ताकडे जाणार्या गाड्यांचे 45 मिनीटे वाचत आहे. पुर्वी इंजनचा डबा बदलण्यासाठी दौंडला पाऊणतास वेळ वाया जात होता. ते आता थांबले आहे.
नगर-पुणे महामार्गावर दिवसंदिवस ट्रॅफिक वाढत आहे. शिक्रापूर ते पुणे दरम्यान नेहमी वाहतुकीची मोठी कोंडी असते. तर या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा अत्यंत गरजेची झालेली आहे. अनेक युवक-युवती नोकरी व शिक्षणासाठी पुण्याला जातात.
तसेच शिर्डी सारख्या धार्मिक तिर्थस्थळी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. या पार्श्वभूमीवर ही रेल्वे सेवा महत्त्वाची व गरजेची गोष्ट बनली असून, ती त्वरीत सुरु होण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे विभागाने पुणे-लोणावळा, पुणे- बारामती शटल रेल्वे सेवा सुरु केलेली आहे.
पुणे-जेजुरी-सातारा ही रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मात्र गरज असून देखील पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा प्रलंबीत राहिली आहे. संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन हे आंदोलन केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन रुपातील वाढलेल्या दाढीचे फोटो ठेऊन हा सुर्यनामा करुन, फक्त महाराजांसारखी दाढी वाढवून चालणार नसून,
त्यांच्यासारखे जनहिताचे निर्णय घेऊन ते सिध्दीस न्यावे लागणार असल्याचे जाहीर केले जाणार आहे. या आंदोलनासाठी अॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, अंबिका जाधव, पोपट भोसले आदी प्रयत्नशील आहेत.