Ahmednagar News : खाजगी तत्वावर देण्यात आलेल्या श्वान निर्बिजीकरण कामात झालेल्या घोटाळ्याबाबत चौकशी करुन संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना (ठाकरेगट) च्यावतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, परेश लोखंडे, संदिप दातरंगे, पप्पू भाले, गौरव ढोणे, जेम्स आल्हाट, अरुण झेंडे, महेश शेळके, शाम सोनवणे, मुन्ना भिंगारदिवे, गिरिष शर्मा, दिपक कावळे, नरेश भालेराव, अक्षय नागापुरे आदि उपस्थित होते.
आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या सामान्य नागरिक आबाल वृद्धांच्या जीवावर उठल्या आहेत. ही परिस्थिती का निर्माण झाली याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मागील वर्षी श्वान निर्बिजीकरण विषय प्राधान्याने हाताळण्यात आला.
मनपाने हे काम खाजगी तत्वावर देण्याचे ठरवून एका ठेकेदार संस्थेला दिले. त्या संस्थेने बोगस बिले काढून मनपाची आणि पर्यायाने नगरकरांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे या खाजगी श्वान निर्बीजीकरणाच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार संस्थेस काळ्या यादीत टाकण्यात यावे.
नगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. नगरच्या चौकाचौकात रात्री अपरात्री आणि दिवसाढवळ्या मोकाट कुत्यांच्या टोळ्या पादचारी आणि वाहन चालकांचे भुंकून स्वागत करण्यासाठी उभ्या असतात. अनेक वेळा त्या टोळ्या वाहन चालकावर सामूहिक हल्ला करतात.
रात्रीच्या वेळी तर नगरकरांना जीव मुठीत धरून रस्त्यावर प्रवास करावा लागतो. अनेक नागरिकांचा आणि आबाल वृद्धांचा पिसाळलेल्या कुर्त्यांनी चावा घेतल्याने मृत्य देखील झालेला आहे. अशी परिस्थिती असताना मागील वर्षी श्वान निर्बिजीकरण आणि मोकाट कुत्री पकडण्यासाठी मनपाने एका संस्थेला टेंडर दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा या टेंडरसाठी संबंधित ठेकेदार संस्थेला शॅडो पार्टनर होता. त्यामुळे या कामात प्रचंड असा घोटाळा झाला. प्रत्यक्ष सर्व कामे कागदावरच झाली आणि प्रति श्वान निर्बिजीकरण केल्याचे दाखवून लाखोंची बिले काढण्यात आली.
आता देखील तेच होणार आहे. यावर्षी नव्याने टेंडर काढण्याचे ठरवण्यात आले असून त्या प्रक्रियेत महिना ३ लाख रुपये देण्याचे मनपाने परस्पर ठरवले आहे. तीन महिण्यासाठी नऊ लाख रुपयांचे ते काम आहे. आणि आता देखील मागील ठेकेदार कंपनीला ते काम देण्याचा आणि पर्यायाने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यालाच ते टेंडर देण्याचा घाट घातला जात आहे.
त्यासाठी मनपा थातुरमातुर टेंडर प्रक्रिया राबवित आहे. यामुळे पुन्हा हे काम कागदावरच होऊन लाखोंची बिले अदा होतील आणि मोकाट कुत्री रस्त्यावरच राहतील. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतच राहील. भ्रष्टाचाराचे खूप मोठे षडयंत्र असून आपण ते रोखावे. अन्यथा शिवसेनच्यावतीने मोकाट कुत्री पकडून मनपाच्या दारात आणून बांधेल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.