अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्यानुसार आजपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये किलबिलाट पाहायला मिळणार आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण, कमी मृत्यूदर आणि घरीच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पाहता शाळा सुरु करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली होती.
याशिवाय ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा देखील समोर आल्यानं शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली. शालेय शिक्षण विभागानं ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी आहे.
त्याठिकाणी नियमावलीसह शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला. त्यानुसार राज्यात काही ठिकाणी शाळा आजपासून सुरु होत आहेत शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी करोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी.
विद्यार्थ्यांमध्ये थोडी लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी. एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास तो वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाला करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
पालकांनी काळजी करू नये कारण जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असा शाळा सुरू करण्यामागील हेतू आहे. पालकांनी काळजी न करता नियमांचे पालन करावे, असे आवाहन टोपे यांनी केले.