अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- शासनाने दि. ४ ऑक्टोपासून शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या 2 हजार 26, तर शहरातील आठवी ते बारावीच्या 96 अशा एकूण 2 हजार 122 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. कोरोनामुळे गतवर्षीही ऑनलाइन अध्यापन सुरू होते.
दिवाळी सुट्टीनंतर सुरुवातीला नववी ते बारावी व जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र, वार्षिक परीक्षेपूर्वीच कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने परीक्षाच रद्द करण्यात आल्या व सरसकट मुलांना पास करण्यात आले.
जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. परंतु, कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली. मात्र आता करोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
त्यामुळे करोनाचे नियम पाळून येत्या 4 ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहावे लागणार असल्याने दीड वर्षांपासून सुरू असलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमापासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे.