वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध घेतला, परंतु…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कुकडी नदीच्या पुरात हात-पाय धुण्यासाठी गेलेला इसाक रहेमान तांबोळी (वय ३५, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा रिक्षाचालक तोल जाऊन पाण्यात पडल्याने वाहून गेला.

ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमरास घडली. पोलिसांनी बुधवारी दिवसभर रिक्षाचालकाचा शोध घेतला, परंतु उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता.

रांजणगाव गणपती येथील उषा सुरेश जगदाळे या पारनेर तालुक्यातील जवळे येथील आपल्या मुलीस नवरात्रोत्सानिमित्त फराळाचे पदार्थ देण्यासाठी रिक्षातून (एमएच १२ क्युआर ७१२६) मंगळवारी दुपारी इतर दोन महिलांसह आल्या होत्या.

मुलीच्या भेटीनंतर त्यांनी निघोज येथील मळगंगा देवीचे दर्शन घेतले. परतत असताना कुकडी नदीपात्रालगतच्या कुंडावरील मंदिरात दर्शनासाठी त्या थांबल्या होत्या.

रिक्षाचालक तांबोळी नदीत हातपाय धूत असताना शेवाळावरून घसरून तो पाण्यात पडला. जवळच्या नागरिकांच्या ते लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला, परंतु पाण्याच्या प्रवाहास प्रचंड वेग असल्याने काही क्षणात इसाक दिसेनासा झाला.

दर्शन घेऊन परतलेल्या महिलांना हे समजल्यानंतर त्यांनी इसाक याच्या कुटुंबास दुर्घटनेची माहिती दिली. सायंकाळी इसाकचे नातेवाईक, तसेच पारनेरचेे पोलिस घटनास्थळी पोहोचले. बुधवारी सकाळपासून नातेवाईक नदीपात्रात शोध घेत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24