अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर शहर व तालुक्यात यापूर्वी बँकांचे एटीएम फोडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यातच पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
ती म्हणजे तळेगाव दिघे येथील एका बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्यावेळी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल 16 लाख 50 हजार रुपयांची रोकड लांबविली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एका बँकेचे एटीएम आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला.
यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातील तब्बल 16 लाख 50 हजार रुपयांची रक्कम लुटून चोरटे पसार झाले.
सकाळी बँक कर्मचार्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर घटनेबाबत संगमनेर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत एटीएम फोडीच्या घटनेचा तपास सुरु केला आहे.
यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.