Ahmednagar News : फुंदेटाकळी फाटा व आगसखांड शिवारात राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी दोन ठिकाणी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह आलेल्या मोर्चेकऱ्यांना जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची तयारी करण्यात आली आहे.
सुमारे शंभर ते सव्वाशे एकर जागा गुरुवारी २३ जेसीबी यंत्रांनी साफ करण्यात आली आहे. आमदार मोनिका राजळे व सकल मराठा समाजाचे तालुक्यातील कार्यकर्ते – युवकांनी तयारीचा आढावा घेतला आहे. २१ जानेवारीला सकाळी जरांगे पाटील व त्यांचे सहकारी मुंबईला जाण्यासाठी पाथर्डी तालुक्यातुन जाणार आहेत.
मातोरी येथुन ते सकाळीच मिडसांगवी, खरवंडी, येळी, फुंदेटाकळी आगसखांड, या मार्गाने ते पाथर्डी- तिसगाव, करंजी व बाराबाभळी येथे येणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातुन भाकरी येणार आहेत. तसेच भाजीची सोय जेवणाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
अनेक दानशुरांनी पाण्याच्या बाटल्या, जार व भाजीसाठी मसाले व साहित्यासाठी मदत देण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील २३ जेसीबी मालकांनी स्वतःच्या खर्चाने सुमारे सव्वाशे एकर जागेची स्वच्छता व सफाई करुन दिली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने एक हाक दिली तर जेसीबी मालकांनी एक रुपया न घेता हे काम करून दिले. गावातुन लोकवर्गणी करुन इतर सुविधा देण्याचे काम करण्यात येणार आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांनी गुरुवारी जरांगे पाटील जेथे जेवणासाठी थांबणार आहेत,
त्या जागेची पाहणी करून मदतीच्या कामकााचा आढावा घेतला. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रात्रंदिवस काम करून तयारी करीत आहेत.