अहमदनगर बातम्या

नेवासा तालुक्यामध्ये दुष्काळाचे तीव्र सावट, पाण्यावाचून पिके वाया जाण्याची भीती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नेवासा तालुक्यामध्ये यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाण्याची टंचाई भासत आहे. पुढे दुष्काळाचे सावट उभे असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या कांदा, ऊस, गहू, हरभरा पिकांना शेवटचे पाणी देण्यासाठी पाणी शिल्लक नसल्यामुळे आता तोंडी आलेला घास जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

नेवासा तालुक्यामध्ये सलाबतपूर परिसरामध्ये सध्या विहिरींनी व कुपणलिकेच्या पाण्याची पातळी झपाट्याने घटली आहे. अनेक बोअरवेल, विहिरी कोरड्या ठाक पडल्याचे चित्र नेवासा तालुक्यातील सलाबतपूर, दिघी, गोंडेगाव, पिचडगाव, जळका, गिडेगाव, शिरसगाव, वाकडी, गेवराई आदी परिसरात पहावयास मिळत आहे.

ऐन मार्च महिना सुरू होत नाही, तेच शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात की काय, असे प्रश्नचिन्ह समोर उभे आहे. पावसाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्या मध्येच पाटपाण्याची अद्यापही कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नाहीये.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पहावयास मिळत आहे. तरी लवकरात लवकर पाटपाणी उपलब्ध होऊन हातातोंडाशी आलेल्या पिकांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिलासा पाटपाण्याच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु पाटबंधारे विभाग लवकरात लवकर पाणी सोडणार का, हा एक प्रश्न शेतकरी वर्गामधून उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे लवकरात लवकर शासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना पाटपाण्याची सुविधा उपलब्ध करून हातातोडांशी आलेली पिकं वाचवण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गमधून व्यक्त केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office