अहमदनगर बातम्या

Water Scarcity : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई ! लोकांवर स्थलांतराची वेळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Water Scarcity : निवडणुकीचे वारे शांत झाल्यानंतर पाणीटंचाईची तीव्रता अधिक तीव्रतेने पुढे आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्‍यात सुरू असून, टॅंकरने तालुक्‍यात शंभरी गाठली आहे.

टँकर पुरवठा ठेकेदाराच्या मनमानी कारभारापुढे प्रशासनाने हात टेकले असून, जिल्हाधिकार्‍यांनी ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

तालुक्‍यात यापूर्वी एवढी भीषण पाणी टंचाई लोकांना आठवत नाही. निवडणुकीमुळे कार्यकर्ते, गाव पुढारी वेगळ्या वातावरणात होते. लोकांचे गाऱ्हाणे शासन दरबारी मांडणारी यंत्रणा नसल्याने प्रशासनाकडे मागणी करून लोकांनी टँकरचे पाणी पदरात पाडून घेतले. टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची उदासिनता व हलगर्जीपणामुळे मंजूर गावांना पूर्ण क्षमतेने टँकरच्या खेपा होत नसल्याने स्थानिक प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला तब्बल सहा वेळा कारणे दाखवा नोटीस बजावूनही कामामध्ये फारशी

प्रगती नाही. डोंगरदर्‍्यातून व माणिकदौंडी परिसरातील टँकरवर अवलंबून असणारी अनेक गावे अशी आहेत की, ज्यांचा दिवस टँकरचे पाणी पदरात पडल्यावरच सुरू होतो. शाश्‍वत उद्‌भव समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातही अवघा सहा टक्के मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाऊस पडून पाणी मिळायला अजून किमान महिनाभराचा कालावधी असुन, एक एक दिवस टंचाईग्रस्त भागातील लोकांना वर्षासारखा वाटत आहे.

पाण्याअभावी कवडीमोल भावात पशुधन विकले गेले. शेळ्या कोंबड्या पाळून जगण्याची लढाई लढताना तहान भागवायला तांबेभर पाणी वेळेवर मिळत नाही. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील टँकरची संख्या १०० झाली असून, अजून सहा गावांचे प्रस्ताव तयार होत आहेत. जायकवाडी योजनेवरील अमरापूर व राक्षी, मुळा धरणावरील पांढरीपुलचा उद्भव, कुत्तरवाडी, कासार पिंपळगाव, चिंचपूर पांगुळ, या उद्भवावरून पाणी भरले जाते

टँकरच्या खेपा नियमित होत नसल्याने टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयात धाव घेतात. प्रत्येकाला तोंड देत दैनंदिन कामकाज विस्कळीत होत असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढतो. मंजूर टैंकर वेळेवर मिळत नाहीत. अनुभवी चालक, नसल्याने तांत्रिक अडथळे वाढत आहेत, समन्वयक कर्मचारी नसल्याने प्रत्येक वेळी प्रशासनाला ठेकेदाराशी संपर्क साधण्याचे अतिरिक्त काम वादले आहे. टँकर पुरवठादार, स्थानिक प्रशासन, यंत्रणेतील कर्मचारी व उ‌द्भवावरील परिस्थिती याचा समन्वय नाही.

त्यामुळे टंचाईच्या तीव्रतेत भर पडली आहे.पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होऊन महिन्यातून चार किंवा पाच वेळेस पाणी मिळते, पालिका प्रशासन अस्तित्वहीन होऊन शहरातही टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी सुरू केली जात आहे. सर्वत्र प्रशासक राज असून, कर्मचारी, अधिकारी जागेवर सापडत नाही.

पालिका ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे बोट दाखवते, तो विभाग ठेकेदाराकडे, ठेकेदार अधिकाऱ्यांकडे, तर अधिकारी परत शासनाकडे बोट दाखवत सर्वजण मिळून (तहानलेल्या नागरिकांचा चेंडू टोलवाटोलवी करत पावसाची वाट पाहत आहेत. निवडणूक काळात बाटलीबंद पाणी पिऊन कार्यकर्ते, पुढारी पळाले. आता मतदान संपल्याने बहुतेक जण श्रम परिहाराचे मार्ग शोधत बाजूला गेले आहेत. पाणी नेमके कोणी, कधी, किती प्रमाणात द्यायचे, याचा ताळमेळ नसून टंचाईग्रस्त मदतीचे माणसी पाणी पुरवठ्याचे निकष दुर्लक्षित झाले आहेत.

२०११ ची जनगणना आधारभूत मानून वाटप सुरू असल्याने पूर्ण तहान व गरज भागेल एवढेसुद्धा पाणी मिळत नसल्याने टँकर आला की, बादल्या, हंडे, ड्रम, अगदी दुधाचे कॅन घेऊन त्यामागे धावतानाचे ग्रामीण भागातील दृश्य टंचाईची तीव्रता दाखवते. पाण्यावरून भांडणे, साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी, असे प्रकार नित्याचेच झाले असून, घरी आलेल्या माणसाला तांब्याभर पाणी लवकर दिले जात नाही. आंघोळीचे वाहून जाणारे पाणी एका लहानशा खड्यात साठवून तेच पाणी शेळ्या, गाईंसाठी वापरले जाते. सध्या तालुक्‍यात ८४ गावे व ४३३ वाड्या वस्त्यांवर १०० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

एक लाख ६६ हजार ९९२ नागरिकांना पाणी टँकर व्दारे दिले जाते. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे आदींची ऑनलाइन बैठक होऊन पाणीपुरवठयाचा आढावा घेतला. त्रुटींबाबत त्वरित उपाययोजना होतात, ठेकेदाराविरुद्ध कारवाईचे अधिकार स्थानिक पातळीवर नसल्याने जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर होतात. यामध्ये वेळ जाऊन खेपांचे वेळापत्रक विस्कळीत होते. जायकवाडीचा उद्‌भव टँकरसाठी बंद करून पाथर्डी- शेवगाव व ४५ गावांची योजना नियमित चालू ठेवण्याची योजनेवरील नागरिकांची मागणी आहे.

योजनेवरील गावांना टँकर द्यावे लागल्यास राज्यातील टँकर पाणी पुरवठ्याच्या रेकॉर्ड पातळी तालुक्‍यात निश्चितच होणार आहे. शंभर टँकरने रोज पाणी पुरवठा केला जात आहे. ठेकेदार बीड जिल्ह्यातील आहे. सर्वच नियम पाळणे शक्‍य नसल्याचे ठेकेदार उघडपणे प्रशासनाला सांगत आहेत. प्रशासनदेखील हतबल होवुन कोणतीही कारवाई करीत नाही. खेपा नियमित होत नाही. मात्र, कोगदोपत्री मात्र सर्व होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये अनियमितता वाढत आहे. टँकरच्या खेपा नियमाप्रमाणे झाल्या पाहिजेत. कोट्यवधीचा खर्च होऊनही जनता तहानलेली राहत असेल तर मग याला जभाबदार कोण आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा होत नाही. कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देतात. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. याच्या निषेधार्थ तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील टंचाईग्रस्त ग्रामस्थांनी उद्या बुधावर तहसील कार्यालया पुढे उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील परिस्थिती भीषण असून, मंजूर टॅकरच्या खेपासुद्धा होत नाहीत, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे .

टँकरच्या खेपा नियमित व्हाव्यात तात्रिक कारणे सांगुन काही उपयोग नाही. नियमित खेपा झाल्या नाहीत तर कारवाई केली जाईल. तक्रार आल्यास गंभीर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत . महसूल व पंचायत समिती प्रशासन याबाबत गांभीर्याने काम करीत आहे . – शिवाजीराव कांबळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाथर्डी

Ahmednagarlive24 Office