अहमदनगर बातम्या

शेतकरी नवरा नको गं बाई ऐवजी मुलींनी शेतकरी नवरा हवा गं बाई, असे म्हणावे – शालिनीताई विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेती क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती शक्य आहे. अनेक शेतकरी मुले देखील मोठे व्यवसायिक आहेत.

तेव्हा आता शेतकरी नवरा नको गं बाई ऐवजी मुलींनी शेतकरी नवरा हवा गं बाई, असे म्हणावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय लोणी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आधुनिक शेती आणि युवक या अंतर्गत शेतकरी आहे. अन्नदाता तोच आहे, देशाचा भाग्यविधाता या अंतर्गत ५ दिवसीय शिबीराप्रसंगी विखे पाटील बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या की, युवकांनी आधुनिक शेतीचे नवे तंत्रज्ञान समजून घेत शेतीतूनही चांगले करीअर करता येऊ शकते. जे आपण पिकवितो ते आपल्याला विकता आले पाहीजे. राष्ट्रीय सेवा योजनाच्या आधुनिक शेती आणि युवक या राज्यस्तरीय शिबीराच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करुन कृषी उद्योजक व्हावा.

आजचे युवक हे शेतीकडे वळत नाहीत. यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. युवकांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान समजून घेत आरोग्यदायी शेती, प्रक्रिया उद्योग, फळप्रक्रिया यामाध्यमातून पुढे जाण्याची गरज आहे.

यावेळी बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, कॅम्पचे संचालक डॉ. राम पवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब मुंढे, उपप्राचार्य डॉ. बी. डी. रणपिसे, डॉ. ए. एस. वाबळे, डॉ. सी. एस. गलांडे आदीसह राज्यभरातून १६ विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी शैलेश देशमुख म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषी धोरणामुळे आधुनिक शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, समूह शेतीला प्रोत्साहन दिले जाते. शेतीक्षेत्रात तरुणांना मोठी संधी असून रोजगार संधीही मोठी आहे.

शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्रारंभी डॉ. प्रदिप दिघे यांनी या शिबीराचा उद्देश विशद करून या शिबीरामध्ये पाच दिवसीय शिबीरात विविध शेती तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

यांचा उपयोग भविष्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. याप्रसंगी डॉ. बाळासाहेब मुंढे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी आणि प्रा. सुरभी भालेराव यांनी केले. तर डॉ. राम पवार यांनी आभार मानले. शनिवार (दि.२४) फेब्रुवारी रोजी या शिबीराची सांगता होणार आहे.

Ahmednagarlive24 Office